सव्वा दोन लाखांच्या गांजासह दोघांना अटक; मुद्देमाल हस्तगत


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा शिवारातील धामणगाव फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई करत सुमारे २ लाख २३ हजार रुपये किमतीचा ११ किलो गांजा पकडला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून शनिवारी १७ मे रोजी मध्यरात्री एक वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा शिवारातील धामणगाव फाट्याजवळून दोन जण अवैधपणे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याची गोपी नियम माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी पथकाला कारवाई करण्याच्या बाबतच्या सूचना दिल्या. दरम्यान मुक्ताईनगर पोलिसांनी शुक्रवारी १६ मे रोजी सायंकाळी ५.५० वाजता कारवाई करत संशयित आरोपी आकाश उर्फ संतोष विष्णू रावळकर वय-२७ आणि पवन संजय जवरे वय-२७ दोन्ही रा. कुऱ्हा ता.मुक्ताईनगर यांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २३ हजार रुपये किमतीचा ११ किलो ओलसर गांजा जप्त केला आहे. या संदर्भात पोलीस नाईक हरीश गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.