मुंबई : वृत्तसंस्था । विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी आज दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे.
या दोघांना वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. प्राथमिक चौकशीत या दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
विरारच्या विजयवल्लभ या खासगी रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने पालघरच्या जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला १५ दिवसात चौकशी करून अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे.
चौकशी करण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय समितीमध्ये वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी., मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ दयानंद सुर्यवंशी आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ २ चे उपायुक्त संजयकुमार पाटील यांचा समावेश आहे. चौकशी करून १५ दिवसात शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ माणिकराव गुरसळ यांनी दिली.
विजयवल्लभ रुग्णालय आग दुर्घटनेचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०४, ३३७ आणि ३३८ अन्वेय निष्काळजीपणा आणि इतर व्यक्तींच्या जिवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रुग्णालयाचे नव्याने अग्निसुरक्षा लेखापरिक्षण, विद्युत सुरक्षा लेखापरिक्षण केले जाणार असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.