गुरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; चोपडा शहर पोलीसात गुन्हा

चोपडा प्रतिनिधी । शहराच्या बाहेरून जाणाऱ्या रोडवर बोलेरो मालवाहू वाहनात आठ गुरांची निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणाऱ्या दोघांना चोपडा शहर पोलीसांनी अटक केली असून गुरांची सुटका करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त असे की, चोपडा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या चोपडा -धरणगाव रोडने एका वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीसांनी २४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शहराबाहेर रणगाडा चौकात गस्त ठेवून बेलेरो वाहन (एमएच १८ एए ३६८७) वाहनाची चौकशी केली. वाहनात ८ गुरे (गोऱ्हे) यांना कोंबून निर्दयीपणे बांधलेले आढळून आले. याबाबत वाहतूकीचा परवाना नसल्याने वाहनावरील चालक संदीप गंगाराम पावरा (वय-२६) आणि विनोद मोरेश्वर एडकी (वय-४३) दोन्ही रा. शिरपूर, धुळे यांना अटक केली आहे. वाहनातील आठही गुरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक संतोष पारधी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेषराव तोरे करीत आहे. 

Protected Content