जिल्हा कृषी सहकारी संस्थेत दरोडाप्रकरणी दोन जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेत ६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रूपये असणारी तिजोरी पळवून नेली होती. त्यावेळी सर्व चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या गुन्ह्यातील दोन मुख्य संशयित आरोपींना ठाणे व वर्धा येथून अटक केली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव जिल्हा कृषी सहकारी सेवा संस्थेकडे विकास दूध आणि पारले बिस्कीटची एजन्सी असून यामुळे संस्थेत बर्‍याचदा मोठ्या प्रमाणात रोकड असते. या अनुषंगाने ६ जुलै २०२१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अनोळखी चार जणांनी संस्थेच्या कार्यालयाचा कडी कोयंडा ताडून आत प्रवेश केला होता. त्यांनी संस्थेच्या आतील कार्यालयात झोपलेल्या कर्मचार्‍यांना धमकी देऊन चोरीचा प्रयत्न केला. त्यांना तिजोरी न उघडता आल्यामुळे त्यांनी शेवटी तिजोरी घेऊनच पळ काढला. या तिजोरीत अडीच लाख रूपयांची रोकड असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष संजीव मुकुंदराव पाटील यांनी दिली होती . संजीव पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात पोलीसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले होते. यात चार गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले होते. मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे जिल्हापेठ पोलीसांनी गुन्ह्याचा शोध सुरू ठेवला. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो.काँ.समाधान पाटील, विकास पहुरकर, पो.ना. सलीम तडवी यांच्या पथकाने संशयित आरोपी शिवासिंग विरसिंग दुधाणी ( वय २८, रा. साईकृपा नगर, आंबेवली, कल्याण जि. ठाणे ) याला ठाण्यातून आणि विर मंगलसिंग उर्फ डॉनसिंग मायासिंग दुधाणी ( वय ४५ रा.झरी ता. परभणी) याला वर्धा येथून अटक केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्याकडे देण्यात आला आहे.

 

Protected Content