
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतानाच, दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा आणि धारदार कोयता बाळगणाऱ्या दोन तरुणांना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकीसह ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात दोन तरुण घातक शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना १४ एप्रिल रोजी मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांचा सापळा आणि पाठलाग
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कासमावाडी ते नेरी नाका दरम्यान असलेल्या एकता चौकातील मोकळ्या मैदानात सापळा रचला. यावेळी एका पल्सर दुचाकीवरून दोन तरुण येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस पथकाने शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
अटक केलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल
पकडण्यात आलेल्या संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा, एक लोखंडी धारदार कोयता आणि कट्ट्याचे रिकामे मॅगझिन मिळून आले. पोलिसांनी रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमावाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. मेहरूण परिसर) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा कट्टा, ५० हजार रुपयांची दुचाकी आणि कोयता असा एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.



