Home Cities जळगाव चिमुरड्यांच्या धारदार भाषणाने आमदार भारावले ; जळगावात पाथरीच्या विद्यार्थ्यांनी जिंकली मने

चिमुरड्यांच्या धारदार भाषणाने आमदार भारावले ; जळगावात पाथरीच्या विद्यार्थ्यांनी जिंकली मने

0
104


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असताना, भारतीय जनता पार्टीच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत व्यासपीठावर एका आगळ्यावेगळ्या दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर, पाथरी (ता. जि. जळगाव) येथील अवघ्या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुरड्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने उपस्थित जनसमुदायाला आणि मान्यवरांना थक्क केले.

प्रभावी वक्तृत्व आणि कौतुक :
आराध्या राजेंद्र सोनवणे आणि अनया दीपकसिंग पाटील या दोन विद्यार्थिनींनी आपल्या वर्गशिक्षिका उज्वला दयाराम सावकारे (वाडेकर) यांच्यासोबत या व्यासपीठावर हजेरी लावली होती. आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत या चिमुरड्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आपले विचार मांडले. एखाद्या अनुभवी वक्त्यालाही लाजवेल अशा शैलीत आणि आत्मविश्वासाने त्यांनी हजारोंच्या समुदायासमोर भाषण केले. त्यांचे शब्द आणि मांडणी ऐकून आमदार राजू मामा भोळे यांनी तात्काळ त्यांचे कौतुक करत त्यांना बक्षीस देऊन गौरविले.

गुरु-शिष्यांच्या नात्याचा भावूक क्षण :
या विद्यार्थिनींच्या प्रभावी भाषणामुळे उपस्थित नागरिक भारावून गेले होते. आपल्या विद्यार्थिनींना इतक्या मोठ्या व्यासपीठावर आत्मविश्वासाने बोलताना पाहून त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका उज्वला सावकारे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शिक्षिकेने घेतलेले कष्ट आणि विद्यार्थिनींनी दिलेली ही पावती पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

कमी वयात विचारांची प्रगल्भता :
दुसरीतील या विद्यार्थिनींनी मांडलेले बाबासाहेबांचे विचार ऐकून केवळ भाषणाची शैलीच नव्हे, तर त्यांच्यातील विचारांची प्रगल्भता पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगावात अनेक कार्यक्रम झाले, मात्र पाथरीच्या या दोन कन्यांनी गाजवलेली ही सभा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. समाजात शिक्षणाचे महत्त्व या चिमुरड्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


Protected Content

Play sound