न्युयार्क-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचा ब्लू बर्ड लोगो अखेर लिलावात विकला गेला आहे. एलन मस्कने एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्यापूर्वी ट्विटर नावाच्या या प्लॅटफॉर्मचा लोगो निळ्या पक्षाच्या प्रतिमेने साकारला गेला होता. मात्र, मस्कने हे प्लॅटफॉर्म खरेदी केल्यानंतर त्याचे नाव आणि लोगो बदलण्यात आले. त्यानंतर आता या जुन्या लोगोचा लिलाव करण्यात आला आहे.
ट्विटरचा ऐतिहासिक ब्लू बर्ड लोगो RR ऑक्शनमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. या निळ्या पक्ष्याचा लिलाव तब्बल 34,375 डॉलर्स (सुमारे 30 लाख रुपये) इतक्या किमतीला झाला. लिलाव कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुमारे 254 किलो वजनाचा, 12 फूट लांब आणि 9 फूट रुंद असलेल्या या निळ्या पक्ष्याच्या लोगोच्या खरेदीदाराची ओळख मात्र उघड करण्यात आलेली नाही.
एलन मस्कच्या निर्णयानंतर लिलाव एलन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालयावरून प्रतिष्ठित ब्लू बर्ड लोगो काढण्यात आला आणि प्लॅटफॉर्मचे नाव बदलून X ठेवण्यात आले. मस्क यांनी ट्विटरचा ब्रँड पूर्णतः नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 2023 मध्ये एका पोस्टमध्ये घोषित केले होते की, “कंपनी लवकरच ट्विटर ब्रँडला निरोप देईल आणि हळूहळू सर्व पक्षी नष्ट होतील.” या घोषणेनंतर ब्लू बर्डच्या प्रतीकात्मक अस्तित्वाचा शेवट या लिलावाने झाला आहे.
मस्क आणि ‘X’ चे आकर्षण एलन मस्क यांना ‘X’ हे अक्षर खूप पूर्वीपासून आकर्षित करत आहे. त्यांनी 2022 मध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर त्याचे रूपांतर एवरीथिंग अॅपमध्ये करण्याचा मानस व्यक्त केला होता. यासोबतच त्यांनी xAI नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअपही सुरू केला आहे, जो ‘विश्वाचे खरे स्वरूप समजून घेणे’ या महत्त्वाकांक्षी ध्येयावर काम करणार आहे.
अन्य ऐतिहासिक वस्तूंचाही लिलाव ब्लू बर्ड लोगोच्या लिलावासोबतच इतर ऐतिहासिक तंत्रज्ञानविषयक वस्तूंचा लिलाव देखील करण्यात आला. Apple-1 संगणक सुमारे 3.22 कोटी रुपये (375,000 डॉलर्स) ला विकला गेला. स्टीव्ह जॉब्स यांच्या स्वाक्षरी असलेला Apple चेक सुमारे 96.3 लाख रुपये (112,054 डॉलर्स) ला विकला गेला. पहिल्या पिढीतील 4GB आयफोन (सीलबंद पॅक) 87,514 डॉलर्स ला विकला गेला.
मस्कच्या एक्स प्लॅटफॉर्मच्या पुढील योजना ब्लूमबर्गच्या फेब्रुवारीमधील अहवालानुसार, X सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या 44 अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. यापूर्वीही मस्कने लिलावासाठी ट्विटरशी संबंधित इतर वस्तू ठेवलेल्या होत्या, ज्यामध्ये कंपनीचा जुन्या लोगोव्यतिरिक्त स्मृतिचिन्हे, ऑफिस फर्निचर आणि स्वयंपाकघरातील उपकरणांचा समावेश होता. एलन मस्क यांनी ट्विटरचा इतिहास मिटवण्याचा स्पष्ट निर्णय घेतला असून, ट्विटरच्या ब्लू बर्ड लोगोचा हा लिलाव त्या दिशेने झालेली महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे.