Home टेक्नोलॉजी इंस्टाग्रामवर आता रील्स शूट करताना स्क्रीनवरच दिसणार स्क्रिप्ट !

इंस्टाग्रामवर आता रील्स शूट करताना स्क्रीनवरच दिसणार स्क्रिप्ट !


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने कंटेंट क्रिएटर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि आकर्षक फीचर सुरू केले आहे. रिल्स तयार करणाऱ्या क्रिएटर्सना आता अ‍ॅपमध्येच ‘टेलीप्रॉम्प्टर’ची सुविधा मिळणार आहे. या नव्या फीचरमुळे व्हिडीओ शूट करताना मोबाईलच्या स्क्रीनवरच स्क्रिप्ट दिसणार असून, एकाच टेकमध्ये व्हिडीओ तयार करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे एडिटिंगचा वेळ वाचणार असून, स्क्रिप्टमध्ये चूक होण्याची शक्यताही कमी होणार आहे.

स्टुडिओमध्ये बातम्या वाचताना किंवा कार्यक्रम सादर करताना अँकर टेलीप्रॉम्प्टरचा वापर करतात. त्याच धर्तीवर आता इंस्टाग्रामवर रिल्स तयार करणाऱ्या यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. यामुळे वेगळे टेलीप्रॉम्प्टर अ‍ॅप वापरण्याची गरज राहणार नाही. यूजर्स आपल्या व्हिडीओची स्क्रिप्ट थेट इंस्टाग्राममध्ये पेस्ट करून स्क्रीनवर पाहत सहजपणे रिल्स तयार करू शकतील.

हे फीचर वापरण्यासाठी सर्वप्रथम इंस्टाग्राम अ‍ॅप उघडावे. त्यानंतर खालच्या बाजूला असलेल्या ‘प्लस’ चिन्हावर क्लिक करून ‘रिल्स’ हा पर्याय निवडावा. पुढे कॅमेरा सुरू केल्यानंतर डाव्या बाजूला ऑडिओ, इफेक्ट्स, ग्रीन स्क्रीन आणि टच-अप्स यांसारख्या पर्यायांमध्ये ‘टेलीप्रॉम्प्टर’चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून स्क्रिप्ट पेस्ट करता येईल आणि त्याच स्क्रिप्टच्या मदतीने व्हिडीओ रेकॉर्ड करता येईल.

दरम्यान, इंस्टाग्रामने अलीकडेच ‘इंस्टंट्स’ हे नवीन फीचरही सुरू केले आहे. स्नॅपचॅटला टक्कर देण्यासाठी आणलेल्या या फीचरमध्ये यूजर्सना २४ तासांसाठी लाईव्ह फोटो शेअर करण्याची सुविधा मिळते. विशेष म्हणजे हा फोटो फक्त एकदाच पाहता येतो. त्याचा स्क्रीनशॉट घेता येत नाही किंवा तो गॅलरीमध्ये सेव्हही करता येत नाही.

सध्या इंस्टाग्रामचे ‘टेलीप्रॉम्प्टर’ फीचर टप्प्याटप्प्याने सर्व यूजर्ससाठी सुरू केले जात आहे. त्यामुळे काहींना हे फीचर लगेच दिसणार नाही. मात्र अ‍ॅप अपडेट केल्यानंतर लवकरच ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रिल्स बनवणाऱ्या आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कंटेंट क्रिएटर्ससाठी इंस्टाग्रामचे हे नवे फीचर मोठी दिलासादायक आणि उपयोगी सुविधा ठरणार आहे.


Protected Content

Play sound