कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) गावातील सार्वजनिक नळ तात्काळ सुरु करावा, या मागणीसाठी तळईच्या ग्रामस्थांनी सरपंचांच्या घरावर आज सकाळी मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला.
तळई ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी आज सरपंच कल्पना प्रकाश महाजन यांच्याकडे मोर्चा काढला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ग्राम पंचायत व सरपंचांच्या कारभाराचे वाभळे काढले. संतप्त ग्रामस्थांनी सरपंच व सरपंच पती यांना धारेवर धरत पाणी प्रश्नाबाबत जाब विचारला. गावातील जनतेचा घसा कोरडा पडला आहे. गावातील नळांना पाणी येत नाही. आलेच तर पाणी पुरवठा देखील सुरळीत होत नाही. त्यामुळे गल्लीत सार्वजनिक नळ द्यावा, अशा मागणी घेऊन आलेल्या ग्रामस्थांनी सरपंच महाजन यांना खडे बोल सुनावत साधी कामं होत नसतील तर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.