जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद टोल नाक्याजवळ नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने धडक कारवाई करत २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, तंबाखू, गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी ट्रक मधून क्रमांक (एचआर ३८, टी ५४१०) यामधून बेकायदेशीररित्या तंबाखू गुटखा व सुगंधित पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता नशिराबाद टोल नाक्याजवळ धडक कारवाई करत आयशर ट्रक पकडला. यावेळी पोलीसांनी वाहनाचे तपासणी केली असता त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखू आढळून आला. दरम्यान पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सकाळी ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अखिल खान सुलतान खान वय-४८, रा. खंडवा, मध्यप्रदेश, फिरोज खान छोटू खान वय-३६ रा. इंदौर, मध्य प्रदेश, संजय (पूर्ण नाव माहित नाही) रा.सेंधवा मध्य प्रदेश आणि करडा (पुर्ण नाव माहित नाही) रा. चाळीसगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.