जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पोदार शाळेजवळ भरधाव बसने ट्रकला मागील बाजूने धडक दिल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रकमधील अनिल समाधान पाटील हे जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, ट्रकचालक मिलिंद अशोक सोनवणे (वय २८, रा. बांभोरी , ता. धरणगाव) हे त्यांची ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ६५५६) बांभोरीकडून जळगावकडे घेऊन येत होते. त्याच वेळी जळगावकडून बांभोरीकडे जाणाऱ्या बसचा चालक आनंदा दामू माळी (रा. विदगाव) याने दारुच्या नशेत बस (क्र. एमएच १४, बीटी २३०४) भरधाव चालवत ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक उलटली व ट्रकमधील अनिल पाटील हे जखमी झाले. यामध्ये बसचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी ट्रकचालक मिलिंद सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बसचालक आनंदा माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.