गोळीबाराने हादरले भुसावळ; तरूण गंभीर जखमी

भुसावळ प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गावठी कट्टे सापडणार्‍या भुसावळमध्ये आज रात्री एका तरूणावर गोळीबार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. या तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील रेल्वे हॉस्पिटल जवळील कब्रस्थान जवळ दिनांक ९ जुलै रोजी रात्री ९.४० वाजेच्या सुमारास आदित्य लोखंडे (वय -१९, राहणार आंबेडकर नगर,ज्ञानकेंद्र जवळ, भुसावळ) या तरुणावर अज्ञात इसमाने कब्रस्थान जवळ गोळीबार केल्याची घटना घडली. यात तो तरूण जखमी झाला असून जखमीला गोदावरी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या तरूणाच्या मानेवर गोळी लागली असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोदावरी हॉस्पिटल मध्ये शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी हे जखमींची जाब-जबाब घेण्यासाठी रवाना आले आहे. या प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

भुसावळमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गावठी कट्टे जप्त करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, रात्री झालेला गोळीबार हा चिंताजनक मानला जात आहे.

Protected Content