प्रांताधिकारी कार्यालयावर आदिवासी समुदायाचा भव्य मोर्चा !

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी तडवी भिल समाजातर्फे फैजपूर प्रांत कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने सकल आदिवासी तडवी भिल समाज रस्त्यावर उतरला होता.

दिवसेंदिवस आदिवासी तडवी भिल जमातीवर होणारा अन्याय,अत्याचार व होणारी घुसखोरी या विषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी तडवी भिल एकता मंच च्या वतीने हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पिवळे झेंडे हातात घेवुन आदिवासी तडवी भिल बांधवानी पारंपरिक वेशभूषासह संस्कृती जतन करून या आक्रोश मोर्चा मध्ये आपले हक्क मिळविण्यासाठी,न्यायासाठी आपली गर्‍हाणी शासनापर्यंत पोहचविण्या साठी सातपुडा पर्वतातील दर्‍या खोर्‍यातून तसेच आसपासच्या खेड्यापाड्या बरोबर यावल रावेर,चोपडा,भुसावळ, मुक्ताईनगर,जळगांव यासह विविध ठिकाणाहून हा जनसागर एकत्र आला होता. याप्रसंगी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,तंट्या मामा भिल, आदिवासी जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा असलेला रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

या मोर्चात अबाल वृद्ध,तरुण वर्ग तसेच महिला वर्गाची संख्या लक्षणिय होती.दरम्यान मोर्चा मध्ये मागण्यांच्या फलकांनी लक्ष वेधून घेतले होते.तर घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून निघाला होता.परंतु अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हा मोर्चा फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना पासून सकाळी १० वाजता अंकलेश्वर-बर्‍हापूर राष्ट्रीय महामार्ग ते फैजपूर शहरातील बसस्थानक,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग(छत्री चौक)मार्गे प्रांतकार्यालय असा चार किलोमीटर लॉंग मार्च काढण्यात आला होता.

यावेळी प्रांत कार्यालयासमोर आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच चे अध्यक्ष एम. बी. तडवी ,आरपीआय आठवले गटाचे राजू सूर्यवंशी, युवा नेते धनंजय चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे शमीभा पाटील,भिम आर्मी चे रमाकांत तायडे,गणेश सपकाळे,आदिवासी एकता परिषदचे सुनील गायकवाड,आदिवासी एकलव्य परिषदेचे अफसर तडवी यांनी संभोधित केले.

या मोर्चाला राष्ट्रीय आमजन सेवा पार्टी चे अजित एन. तडवी, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले,मनसेचे चेतन ढळकर, राष्ट्रीय आमजन सेवा पार्टी तालुका अध्यक्ष फिरोज तडवी,यांनी भेटी दिल्या.यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी निवेदन स्वीकारले.

अशा होत्या मागण्या

धनगर समाजाला एस. टी. मध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण न देवु नये,जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींना एसटी अनुसूचित जमातीचे दिलेले जातीचे दाखले रद्द करावे,बोगस आदिवासी लोकांना जातीचे दाखले देणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे, जळगांव जिल्ह्यातील सर्व प्रांत कार्यालयातून दिल्या जाणार्‍या आदिवासी समाजाचे एस.टी. दाखले तपासण्यासाठीच्या समितीमध्ये स्थानिक आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात यावा. फैजपूर येथे एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी साठी आदिवासी वस्तीगृह चालू करण्यात यावे,पेसा कायदा अधिक सक्त करण्यात यावा,शबरी घरकुल योजना व सर्व आदिवासी योजना यावल प्रकल्प कार्यालयात मार्फत राबविणे पंचायत समिती मार्फत राबू नये,तिडया अंधारमळी रस्ता तयार करावा यासह तेरा मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाला यांनी दिला पाठींबा

आदिवासी बचाव कृति समिती नाशिक महाराष्ट्र राज्य,जय आदिवासी युवा संघटन (जयस)महाराष्ट्र राज्य,आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य,वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा,राष्ट्रीय आमजन सेवा पार्टी,भीम आर्मी, आदिवासी पारधी महासंघ म.राज्य,आदिवासी पारधी विकास परिषद,महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद,एकलव्य आघाडी महारष्ट्र राज्य,लहुजी शक्ती सेना,भारतीय ट्रायबल पार्टी.महाराष्ट्र राज्य,सविधान आर्मी रावेर,कौमी एकता फॉडेशन नायगाव,आदिवासी ग्राम विकास मंडळ.नायगाव,तडवी फैजपूरियन्स गृप फैजपूर, आठवले गट आर.पी.आय.जळगव जिल्हा या संघटनांनी आदिवासी तडवी भिल्ल बांधवांच्या आक्रोश मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला.

घोषणांनी दणाणला मोर्चा मार्ग

’एक तिर एक कमान सब आदिवासी एकसमान’,आरक्षण आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा,तंट्या मामाने पुकारा हैं भारत देश हमारा हैं,आदिवासी संस्कृती जिंदाबाद,बोगस आदिवासी हटाव खरे आदिवासी बचाव,जल जमीन आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आदी घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून निघाले होते.

Protected Content