जळगाव प्रतिनिधी । वनमहोत्सवात नागरिकांना वृक्ष लागवडीसाठी जळगाव वन विभागाकडून ४ लाख २१ हजार रोपे व एक लाख औषधी रोपांचा सवलतीच्या दरात पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती उप वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी दिली आहे.
वन विभागातर्फे दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी वनमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उपलब्ध करण्याच्यादृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्षलागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा. त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे. यादृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. या अनुषंगाने यंदाचा वन महोत्सव सुरू झाला असून नागरिकांनी सवलतीच्या दरात उपलब्ध असणारी रोपे घ्यावीत असे आवाहन उपवनसंरक्षक डिगंबर पगार यांनी केले आहे.