रायसोनी महाविद्यालयास युजीसीची स्वायत्तता

जळगाव प्रतिनिधी । येथील रायसोनी इस्टिट्यूटच्या रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयास युजीसीने स्वायत्ततेचा दर्जा प्रदान केला आहे. हा सन्मान मिळवणारी रायसोनी ही खान्देशातील पहिली अभियांत्रिकी व बिझनेस मॅनेजमेंट स्वायत्त इस्टिट्यूट ठरली आहे.

रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने (नवी दिल्ली) स्वायत्ता घोषित केल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. रायसोनी इस्टिट्युटने सन २००७मध्ये रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाची स्थापना करून आतापर्यंत अनेक विविध क्षेत्रात कार्य केले आहे. युजीसी नॅक स्वायत्त संस्थेतर्फे विविध विद्यापीठ मान्यताप्राप्त महाविद्यालयांचे मूल्यांकन करून मानांकन दिले जाते. या अनुषंगाने स्वायत्तेचा दर्जा प्राप्त झाल्याने आता कौशल्यधारित आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा महाविद्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे येथे जुन्या अभ्यासक्रमासहित लवकरच विविध नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याची माहिती इन्स्टिट्युटचे अध्यक्ष सुनील रायसोनी, संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली आहे.

रायसोनी इन्स्टीट्युटने नोव्हेंबर २०१९मध्ये महाविद्यालयाने कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वायत्तेचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर आयोगाने सहा तज्ज्ञांची समिती गठीत करून १३ व १४ मार्च २०२० रोजी महाविद्यालयास भेट देऊन अहवाल आयोगाकडे पाठवला होता. त्या समितीच्या अहवालास विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी देऊन महाविद्यालयास स्वायत्तता दर्जा प्रधान केल्याचे पत्र पाठवले आहे.

Protected Content