उटखेडे, ता.रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे आज शनिवार, दि. १६ जुलै रोजी जि.प.मराठी मुलांची शाळा, उटखेडेतर्फे गावातून लक्षवेधी वृक्षदिंडी काढली. वृक्षसंवर्धनाचे संदेश देत विद्यार्थ्यांनी विविध प्रबोधनपर घोषणा दिल्या.
ग्रामस्थांनी दिंडीला चौका चौकात उदंड प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांचे व शिक्षकांच्या संयोजनाचे कौतूक केले. शाळेचे पदवीधर शिक्षक तथा पर्यावरणमित्र रमेश राठोड गुरुजी संस्थापित श्री वसुंधरा सीड बँक व निसर्ग जतन समिती कडून प्रत्येक विद्यार्थ्यांना विविध बिया व रोपे विनामूल्य देण्यात आले. दिंडीत विविध रोपे, बॅनर, तक्ते, फलक, पताका, कुंड्या आणि आकर्षक पानाफुलांच्या सजावटीयुक्त ‘वृक्ष पालखी‘चे महिलांनी स्वागत करून मनोभावे पूजन केले. दिंडी बँड पथकाच्या तालावर गल्ली बोळातून ग्रामपंचायत पर्यंत काढण्यात आली.
प्रारंभी विद्यार्थ्यांतर्फे शालेय प्रांगणात विविध प्रजातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.पर्यावरणमित्र रमेश राठोड गुरुजींनी विद्यार्थ्यांची सामुहिक पर्यावरण प्रतिज्ञा घेऊन त्यांना वृक्षसंगोपनाच्या जबाबदारीची जाणीव देऊन वृक्षांचे पर्यावरण संतुलन व सजीवांच्या जीवनातील अनन्य साधारण महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
वृक्षदिंडीत प्रथम महिला नागरीक अर्थात सरपंच श्रीमती सविता गाढे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पत्रकारांनी दिंडीसाठी प्रत्यक्ष शुभेच्छा देऊन कौतुक केले. दिंडीत शाळेच्या मुख्याध्यापिका शशिकला राणे, कवीवर्य रविंद्र बखाल, अरमान तडवी, निसर्गमित्र रमेश राठोड गुरुजी, हुसेन तडवी, प्रतिभा पाटील शिक्षकवृंद शालेय विद्यार्थी व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ वृक्षदिंडीत उपस्थित होते.