जळगावात युवाशक्तीचा गोरगरीबांसह पतंगोत्सव

जळगाव, प्रतिनिधी | युवाशक्ती फाऊंडेशन व साई मोरया गृप यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासकीय नियमांचे पालन करीत ५० लोकांमध्ये सदर पतंगोत्सव पार पडला.

 

मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर युवाशक्तीतर्फे खोटे नगर चौकातील मैदानावर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गोरगरीब मुला-मुलींसह पतंगोत्सव साजरा करण्यात आला.  उडी उडी जाय, पंतंग तेरी उडी उडी जाय; चली चली रे पतंग मेरी चली रे; ढिल दे ढिल दे दे रे भैय्या; यासह एकाहून एक पतंग गीतांच्या तालावर चिमुकल्यांनी मनसोक्त पतंग उडविण्याचा आनंद लुटला. या महोत्सवात   गोरगरीबांनी सहभाग घेतल्याने एक वेगळीच रंगत आली होती. याप्रसंगी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, साई मोरया गृपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, सिंद्धांत कदम, प्रसन्न जाधव, प्रितम शिंदे, पराग पाटील, सुदर्शन इशी आदी उपस्थित होते. या महोत्सवामार्फत वंचित मुला-मुलींच्या जीवनात उत्साह आणण्याचा प्रयत्न आयोजकांतर्फे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नायलॉन व चायनीज मांजावर बंदी असल्याने आयोजकांनी पर्यावरणपूरक मांजा पुण्याहून मागविला होता. हा नायलॉन विरहीत मांजा उपस्थित मुलामुलींना देण्यात आला. यासह छोटा भिम, सिंघम, पतलू मोटू, टॉम ॲण्ड जेरी, तिरंगा व इतर मुलांना भावतील अशा कलाकृतींच्या पतंगाचा समावेश करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना तिळगुळाचे वाटप सुद्धा करण्यात आले.

Protected Content