जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निमखेडी शिवारातील राधिका पॉइंटजवळील मोकळ्या भूखंडातील झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प स्थानिक नागरिकांनी केला. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि मराठी प्रतिष्ठानतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. हरित जळगाव या प्रकल्पाअंतर्गत निमखेडी शिवारातील गट क्र.111 मध्ये मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेविका प्रतिभा पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण धांडे, अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी निंब, करंज, बकूळ, वड, पिंपळ, गुलमोहर, जास्वंद, कन्हेर, चांदणी, बेल अशी 100 च्यावर झाडांची लागवड केली. नितीन साठे, नरेंद्र रडे, संजय कापुरे, रामदास अत्तरदे, तुळशीराम निकम, विजया ठाकरे, शंकुतला भंगाळे, कल्पना धांडे, कल्पना सोनवणे, रजनी ठाकूर यांच्यासह नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.
तसेच उत्कर्ष मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. सुधीर पाटील यांनी जागतिक तापमान वाढ होत असल्याने संभाव्य धोके नागरिकांच्या लक्षात आणून देत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. तर हेमंत बेलसरे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाबाबत सांगितले. मनोज चौधरी व प्रतिभा पाटील यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत उपक्रमास पाठिंबा दिल्या. लक्ष्मण धांडे यांनी प्रास्ताविक केले. संजय कापुरे, सर्जेराव पाटील, शंकुतला भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा सुधीर पाटील यांनी दिली.