स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यापीठास ७५ सायकली सुपूर्त

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जळगाव जिल्हा रोटरी परिवाराच्यावतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास ७५ सायकली आज समारंभपूर्वक देण्यात आल्या.

या सायकली विद्यापीठ परिसरात विद्यार्थी – विद्यार्थिनींचे वसतिगृह, प्रशाळा आणि विद्यापीठाचे मुख्य प्रवेशव्दार या ठिकाणी विद्यार्थ्यांना अंतर्गत वाहतूकीसाठी विनाशुल्क ठेवण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी परिवाराच्यावतीने समारंभपूर्वक सायकली देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, रोटरी ३०३० चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ.आनंद झुनझुनवाला, केशव स्मृती प्रतिष्ठान अध्यक्ष भरत अमळकर, जळगाव जिल्हा रोटरी परिवाराचे इनक्लेव्ह चेअर नंदकुमार अडवाणी, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ. पवार यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी बोलतांना कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी विद्यापीठ आणि समाज हा एकमेकांशी जोडला जाणे आवश्यक असल्याचे सांगून तिनही जिल्ह्यातील नागरीक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक आस्था असणारे घटक यांनी विद्यापीठात यावे व येथील सुविधा पाहून त्यांच्या परिने योगदान द्यावे असे आवाहन केले. अंतर्गत वाहतूकीसाठी या सायकलींचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल व प्रदुषण कमी होईल असे ते म्हणाले.

जिल्हााधिकारी अभिजीत राऊत यांनी महाविद्यालयीन जीवनात सायकलीचे असलेले महत्त्व मी देखील अनुभवलेले असून विद्यार्थ्यांचा त्रास कमी होईल. विद्यार्थ्यांनी वाचणारा वेळ अधिक अभ्यासासाठी द्यावा आणि चांगले पद प्राप्त करुन समाजाला परत करण्याची भावना ठेवावी असे आवाहन केले. डॉ. झुनझुनवाला यांनी भविष्यात विद्यापीठातील काही प्रकल्पांशी रोटरी परिवार जोडला जाईल असे सांगून अजून काही सायकली दिल्या जातील अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी सार्वजनिक संस्थांमध्ये सकारात्मक विचार जोपासायला हवा असेही ते म्हणाले. भरत अमळकर यांनी या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा वेळ, आरोग्य यासाठी फायदा होणार असल्याचे सांगून १०-१० विद्यार्थ्यांचे गट स्वत: विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन तयार करावेत आणि या सायकलींची देखभाल करावी असे आवाहन केले. यातून सहकार्य तसेच सहकार हे तत्व अंमलात येईल असे ते म्हणाले. नंदकुमार अडवाणी यांनी या सायकल भेटीमुळे विद्यापीठाशी रोटरी परिवार जोडला गेला या बद्दल आंनद व्यक्‍त केला.

प्रारंभी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनीष जोशी यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाची माहिती देऊन रोटरी परिवाराचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले. प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी आभार मानले. १२ रोटरी क्लबने एकत्रित येऊन या सायकली भेट दिल्या आहेत.

Protected Content