ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला पुन्हा तारीख

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाच्या सुनावणी आज पूर्ण न झाल्याने उद्या पुन्हा युक्तिवाद होणार आहे. आज ए. एम. खानविलकर यांच्या खंडपीठासमोर युक्तीवाद झाला, त्यानंतर कोर्टाने उरलेल्या युक्तिवादासाठी उद्याची तारीख दिली आहे.

 

आज कोर्टात राज्य सरकारकडून इंपेरिकल डेटा मिळावा यासाठी युक्तिवाद करण्यात आला. आजची सुनावणी जवळपास अर्धा तास चालली, त्यात निवडणुकांबाबतही युक्तिवाद झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र आज सुनावणी पूर्ण झाली नाही. त्यानंतर उर्वरीत सुनावणी उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे आजही कोर्टात ओबीसी आरक्षणाला तारीख पे तारीख मिळाल्याचं पहायला मिळाले.

गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचं घोंगडं भिजत पडले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुका मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांचे काय होणार? हाही पेच कायम आहे.

Protected Content