पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाला रुग्णापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. येथील प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म देऊन या आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तसेच नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्यावर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. त्यांनी जवळ सध्या दोन लाख रुपये असल्याचे सांगून उपचार सुरू करण्याची विनंती केली. मात्र तरी देखील महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.
गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना तिला अधिक त्रास होऊ लागला आणि दोन जुळ्या मुलांना जन्म देऊन महिलेने प्राण सोडला. या घटनेने भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळे या महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी आम्ही रुग्णालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
मृत महिलेचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोर कारभाराची माहिती दिली असता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरी देखील रुग्णालय प्रशासनाने त्यांचे ऐकले नाही. याचा परिणाम म्हणजे गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या घटनेबाबत तक्रार केली असल्याचे समजते.
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका केली. “या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि असंवेदनशीलतेमुळे एका तरुण महिलेचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नी असून, मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही. इतका उद्दामपणा, इतका निर्ढावलेपणा तेव्हाच येतो जेव्हा सत्ताधाऱ्यांचे राजछत्र पाठीशी असते,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबद्दल असंख्य तक्रारी असूनही ते दिमाखात उभे आहे. रुग्णालयाला मिळणाऱ्या सवलती आणि प्रीव्हीलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत. परंतु जर सत्ताधारी आमदाराच्या निकटवर्तीयाच्या जिवावर बेतण्याइतपत त्यांना काहीच वाटत नसेल, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना हे रुग्णालय किती असंवेदनशीलतेने वागवत असेल, याचा विचार करायला हवा.” या प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. या घटनेमुळे पुण्यात संतापाची लाट उसळली असून, आरोग्य व्यवस्थेतील असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.