Home मनोरंजन ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन ; 92 व्या वर्षी संगीतविश्व पोरकं

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन ; 92 व्या वर्षी संगीतविश्व पोरकं


मुंबई-वृत्तसेवा । भारतीय संगीतविश्वाला आज मोठा धक्का बसला असून ज्येष्ठ आणि बहुमुखी पार्श्वगायिका Asha Bhosle यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

भारतरत्न Lata Mangeshkar यांच्या लहान बहिणी असलेल्या आशा भोसले यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन एक वेगळाच ठसा उमटवला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी R. D. Burman, O. P. Nayyar, S. D. Burman आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करत अनेक अजरामर गाणी दिली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांती ओम’सारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत.

आशा भोसले यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांना दिली. साश्रू नयनांनी त्यांनी आईच्या निधनाची बातमी जाहीर करत अंत्यदर्शनाची वेळही सांगितली. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत चाहत्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार असून त्यानंतर अंत्ययात्रा काढली जाणार आहे. सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आशाताईंची प्रकृती खालावलेली होती. त्यांना चेस्ट इन्फेक्शन आणि अशक्तपणामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रकृतीबाबत माहिती दिली होती आणि चाहत्यांना प्रायव्हसीचा आदर राखण्याचे आवाहन केले होते.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली असून चाहत्यांची आणि मान्यवरांची मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण देशभरातून राजकीय, सांस्कृतिक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांकडून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound