पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यात काल रात्री आडगाव, सावरखेडे, करमाड, जीराडी, तामसवाडी, मुंदाने आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठा हाहा:कार माजवला. या नैसर्गिक संकटामुळे जवळपास 60 टक्के शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या ज्वारी, बाजरी, कांदा, डाळिंब, लिंबू, पपई आणि मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे यांनी केली आहे.
आज सकाळी शेतकरी नेते सुनील देवरे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी तहसीलदार अनिल पाटील आणि तालुका कृषी अधिकारी आहेर साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली. त्यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना नेहमीच कर्जमाफीच्या बाबतीत फसवले जाते, आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी आणि संपूर्ण पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे झालेले नुकसान पाहता शासनाने त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, पीक विमा योजनेतून मदत मिळवून द्यावी, तसेच नव्या कर्जसुविधा द्याव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांची ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकरी संघटना अधिक तीव्र आंदोलन उभे करू शकते.