जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे.
विचारांच्या गर्तेत अडकलेल्या… सिगारेट पित दूरवर एकटक बघत बसणार्या…स्वत:भोवती कपड्यांच्या ढिगारा करुन ठेवणार्या… मात्र कुणाला कधीही त्रास न देणार्या, कुणाशीही न बोलणार्या त्या व्यक्तीचे वाटसरुंना कुतूहुल वाटे… एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्विकारत, त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्याचे आदेश दिले आणि आज त्या घरच्या गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरूणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरु केले आहे.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मळकट कपडे, डोक्यावर नेहमीच टोपी चढविलेल्या, स्व:मग्नतेत असणारा एक तरूण बर्याच महिन्यापासून वावरतांना माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या दृष्टीपथास पडला. कडक ऊन असो वा पाऊस असो वा सद्यस्थीतीला पडणारी कडाक्याची थंडी, या सर्वांमध्ये तो एका कोपर्यात बसून राही. कधीतरी सिगारेटचा झुरकाही तो मारत असे. स्वभावाने अत्यंत हळवे असणार्या डॉ.उल्हास पाटील यांच्या मनात त्या तरुणाविषयी आस्था निर्माण झाली.
एके दिवशी रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांशी त्यांनी या तरूणाच्या अवस्थेबाबत चर्चा केली. मग काय हा तरूण मानसोपचार विभागाकरीता आव्हान ठरला असून त्याच्यावर उपचार करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करून तरूणावर आपण उपचार करू शकतो का? होकारार्थी उत्तर मिळाल्यावर तरूण उपचारास तयार होईल का? किंवा पळून जाईल का? या अनेक शक्यता पडताळून पाहत आज प्रवेशद्वारा बाहेेर जावून त्या तरूणाला उपचारासाठी तयार करण्यात मानसोपचार तज्ञांनी यश मिळवले आहे.
दरम्यानच्या काळात ना आंघोळ ना दाढी, डोईवरचे केस वाढलेले, अंगात मळकट कपडे असलेल्या या तरूणाची सर्वप्रथम दाढी, कटिंग करण्यात आली. या नंतर स्वच्छ कपडे देण्यात आले. वार्डात नेवून त्याची आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले आहे. या तरूणावर उपचार देखिल सुरु झाले असून सकारात्मक प्रतिसाद देखिल मिळत आहे.
वाट चुकलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणणार – माजी खा. डॉ उल्हास पाटील
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. व्यसनामूळे वाट चुकलेल्या देशाचे भवितव्य असलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानसोपचार विभाग करणार असून जास्तीत जास्त तरूणांनी उपचार करून घ्यावे असे आवाहन केले आहे.