मुंबईत बाईक टॅक्सीला परिवहन विभागाकडून परवानगी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओला, उबेर प्रमाणेच आता मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा मोठा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत रॅपिडोसारख्या बाईक सेवा कार्यान्वित होणार असून, त्यामुळे मुंबईच्या ट्रॅफिकमधून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर सततच्या ट्रॅफिकमुळे नागरिकांना प्रवासासाठी अधिक वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो. बाईक टॅक्सीच्या आगमनामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. बाईक टॅक्सी सेवेमध्ये प्रती किलोमीटर केवळ ३ रुपये इतके भाडे आकारले जाणार असल्याने प्रवास स्वस्त होणार आहे.बाईक टॅक्सी सेवेमध्ये महिलांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. चालक आणि प्रवासी यांच्यात पार्टिशन ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. तसेच, महिला प्रवाशांसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनाही केल्या जाणार आहेत.

याआधी रॅपिडो सारख्या कंपन्यांनी मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरू केली होती, परंतु स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विरोधामुळे तसेच सरकारच्या अस्पष्ट धोरणामुळे त्यांना सेवा बंद करावी लागली. मात्र, आता परिवहन विभागाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केल्याने या सेवांना अधिकृत मान्यता मिळणार आहे.बाईक टॅक्सी सेवेमुळे मुंबईकरांना नवीन प्रवासी पर्याय उपलब्ध होणार आहे.

विशेषतः पीक अवर्समध्ये लोकांना कामावर किंवा घरी जाण्यासाठी ही सेवा मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे.बाईक टॅक्सीच्या नव्या धोरणामुळे प्रवासाचा वेग वाढेल, खर्च कमी होईल आणि मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. यामुळेच नागरिकांमध्येही या सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

Protected Content