हेलीकॉप्टर मध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत रंगली ‘विकास पे चर्चा’ !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी जिल्हा दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत हेलीकॉप्टरमध्ये विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.

पाचोरा येथे आज आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पुढाकाराने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह राज्यातील महत्वाचे मंत्री तसेच जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. यात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.

याप्रसंगी चंदूभाऊंनी हेलीकॉप्टरमधून जळगाव विमानतळ ते पाचोरा आणि पाचोरा ते पाळधी असा प्रवास केला. यात त्यांनी मुक्ताईनगरच्या विविध विकासकामांसह योजनांबाबत चर्चा केली. मतदारसंघात विविध कामांना गती आली असून येणार्‍या काळात यातील महत्वाचे टप्पे सुरू होणार आहेत. यासोबत, तालुक्यात अतिशय भव्य स्वरूपाच शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी चर्चा केली. यासोबत, काही महत्वाच्या कामांना निधी मिळण्याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याशी देखील वार्तालाप केला. या प्रकरणी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Protected Content