खेळाच्या मैदानाची जागा हस्तांतरीत करा मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव नगरपरिषद हद्दीतील सुक्या नदीपात्रातील नदीजवळील शासकीय मालकिच्या जागेत शहर विकास आराखड्यातील आरक्षण क्र.७४ आणि ७५ यावर खेळाचे मैदानाचे आरक्षण आहे. तरी सदर जागेवर मैदान विकसित होणेसाठी संबंधित जागा शासनाकडून नगरपरिषदेकडे हस्तांतरीत होणे आवश्यक आहे. तरी सदर जागेत क्रिडा संकुल/क्रिडांगण/ खेळाचे मैदान  विकसित करणेसाठी नगरपरिषदेकडे हस्तांतरीत होण्यासाठी आवश्यक त्या पूर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे सादर करण्याची विनंती भडगाव येथील भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य तथा माजी नगरसेवक ॲड. अमोल नाना पाटील यांनी निवेदनाद्वारे भडगाव नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील, शरद हिरे, मिलिंद बोरसे हे उपस्थित होते.

सुक्या नदीपात्रातील संबंधित गट हे खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहेत. तरीही मागील ४० वर्षापेक्षाही जास्त वर्षापासून सदर जागेचा वापर हा क्रिडांगण म्हणून भडगाव शहरातील हजारो विद्यार्थी, खेळाडू, नागरिक वापर करीत आहेत. याच मैदानावर वर्षानुवर्षे सराव करून शेकडो खेळाडूंनी आपआपल्या खेळात प्राविण्य मिळविले आहे.

अनेक खेळाडूंनी तालुका,जिल्हा, विभाग, राज्य तसेच विद्यापीठ व राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवून पदक प्राप्त करून भडगावचा नावलौकिक वाढविला आहे. याच मैदानावर सराव करणाऱ्या भडगाव शहर व पंचक्रोशीतील ३ हजार पेक्षाही जास्त खेळाडूंनी, तरुणांनी विविध शासकीय विभागात नोकरी प्राप्त केली आहे.

सदर खुल्या मैदानावर आजपर्यंत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, धावणे, ॲथलेटिक्स इ. विविध प्रकारच्या अनेक क्रिडा स्पर्धा वर्षानुवर्षे पार पडल्या आहेत व पार पडत आहेत. सदरच्या मैदानावरील नियमीत सरावामुळे भडगावकरांना निरोगी राहण्यास मदत होते. सदरचे मैदान हे भडगावकर नागरिकांसाठी आत्मियता, आस्थेचा विषय आहे. हे मैदान विकसित व्हावे ही अनेक वर्षापासून भडगावकरांची इच्छा आहे. या इच्छेला मूर्त रूप देण्यासाठी मैदान विकसित करणे कामी येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता व पाठपुरावा होणे आवश्यक आहे. तरी अर्जात नमूद जागा शासनाकडून नगरपरिषदकडे हस्तांतरीत करणेकामी त्वरित सर्व पूर्ततेसह परिपूर्ण प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे पाठविण्यात येऊन जागा हस्तांतरण करुन घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी शुभम पाटील, रितेश पवार, सागर परदेशी, सुशांत पाटील, अभिजित पाटील, तुषार पाटील, निखिल पाटील यांचीही उपस्थिती होती.

Protected Content