महत्वाची बातमी : जळगाव जिल्हा परिषदेतील गटांच्या जागा वाढल्या !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या जिल्हा परिषदेच्या वाढीव जागांबाबत अखेर परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता गटांची पुनर्निर्मीती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसंख्या वाढल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा वाढणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. याबाबत विधेयक देखील संमत करण्यात आले होते. या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये नेमक्या किती जागा वाढणार ? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. आता ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढल्याने याबाबतची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे.

राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ इतकी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्याचे विधेयक नुकतेच मंजूर झाले होते. यानंतर आता ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार वाढीव जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

या शासकीय परिपत्रकानुसार जळगाव जिल्ह्यात आधी जिल्हा परिषदेचे ६७ गट होते. यात आता वाढ होऊन ते ७७ इतके झाल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे. अर्थात, आता जळगाव जिल्ह्यातून ६७ जिल्हा परिषद सदस्य निवडून जाणार आहेत. आता या १० जागा नेमक्या कोणत्या तालुक्यात किती वाढविण्यात आल्यात याची माहिती जळगाव जिल्हा परिषदेतर्फे जाहीर होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या १० गटांसोबत आता जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे २० गण देखील वाढणार असल्याचे यातून स्पष्ट झालेले आहे.

या वाढीव जागांमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या २००० वरून २२४८ इतकी झाली. तर पंचायत समिती सदस्यांची संख्यादेखील ४००० वरून ४४९६ इतकी होणार आहे. राज्यात ३४ जिल्हा परिषदा आहेत. पैकी २५ जिल्हा परिषदांची मुदत संपल्याने त्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या २५ जिल्हा परिषदांमध्ये सध्या १५१० जागा होत्या. नव्या रचनेप्रमाणे त्या १७०५ इतक्या झाल्या आहेत.

Protected Content