Home प्रशासन फैजपूरमधील बकरी बाजारामुळे वाहतूक कोंडी ; स्थलांतराची मागणी

फैजपूरमधील बकरी बाजारामुळे वाहतूक कोंडी ; स्थलांतराची मागणी


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील नागरी वस्तीमध्ये भरविण्यात येणाऱ्या बकरी बाजारामुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याने हा बाजार तात्काळ आणि कायमस्वरूपी शहराबाहेर स्थलांतरित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी रामराज्य सेवाभावी संस्था तसेच शहरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले असून, योग्य निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार समिती अंतर्गत दर बुधवारी भरविण्यात येणारा बकरी बाजार सध्या नागरी वस्तीच्या मध्यभागी भरत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर बाजाराच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, अनेकवेळा रस्ता पूर्णपणे जाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बाजार परिसरात अनेक नामांकित हॉस्पिटल्स, एम.एस. आणि एम.डी. सर्जन डॉक्टरांची रुग्णालये, इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक आणि नर्सिंग कॉलेज कार्यरत आहेत. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नाही, तर विद्यार्थ्यांच्या ये-जा व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि शैक्षणिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बकरी बाजाराची व्याप्ती आता मुख्य रस्त्यापुरती मर्यादित न राहता परिसरातील कॉलनीपर्यंत वाढली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बाजारात आणलेल्या शेळ्यांच्या मलमूत्रामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता निर्माण होत असून, बाजार संपल्यानंतरही तीन ते चार दिवस नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांमध्ये वारंवार वादविवाद होत असल्याने सामाजिक शांततेलाही बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढती गर्दी, अनियंत्रित पार्किंग आणि बाजारातील गोंधळामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल यांच्याकडे अनेकदा तोंडी तसेच लेखी स्वरूपात मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता बकरी बाजारासाठी शहराबाहेर स्वतंत्र जागा निश्चित करून कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


Previous articleदहावीचा निकाल जाहीर ; यंदा देखील मुलींची बाजी
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound