जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते कानळदा रोडवरील खेडी खुर्द फाट्याजवळ ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी सोमवारी ३१ जुलै रोजी रात्री १० वाजता ट्रॅक्टरवरील अनोळखी चालक व मालक यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवरील खेडी खुर्द फाट्याजवळ अवैधरित्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने कारवाई करत सायंकाळी ५ वाजता वाळूने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आडविले. दरम्यान पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या संदर्भात रात्री १० वाजता पोलीस कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहे.