अवैध वाळू वाहतूकी करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, गिरणा नदी पात्रातून बेकायदेशी वाळूची वाहतूक करून चोरटी विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मंगळवारी १९ एप्रिल रोजी सकाळी पोलीस कर्मचाऱ्यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी दीपक कोळी, पोलीस नाईक गुलाब माळी यांनी तालुक्यातील आव्हाने गावाच्या बसस्थानक येथे विना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक  (एमएच १९ सीव्ही १३११) हे वाळू घेवून जात असतांना पकडले. वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता ट्रॅक्टर चालकाने उडवाउडावीची उत्तरे दिली व ट्रॅक्टर सोडून पसार झाला. पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा केले. याबाबत पोलीस नाईक दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गुलाब माळी करीत आहे.

Protected Content