शाळेतून साहित्य लांबविणाऱ्या तीन संशयितांना अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कूल मधून इलेक्ट्रीक मोटार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर साहित्य चोरी केल्याची घटना घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना शिरसोली गावातून मंगळवारी १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. संशयितांकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात पद्मालय इंग्लिश मिडियम स्कूलमधील स्टोअर रूमचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ईलेक्ट्रीक मोटार, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या असा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच शाळेतील कागदपत्रांचे नुकसान केले होते. याप्रकरणी शिक्षक निशादराज रंगनाथ बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ जुलै २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी केलेल्या तपासात ही चोरी शिरसोली गावातील मुलांनी केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भिल (वय-२२), किरण गोपाळ कोळी (वय-२१) आणि मयूर गोपाळ बारी (वय-१८) सर्व रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बुधवारी २ ऑगस्ट रोजी तिघांना जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  अटकेतील संशयिताकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ जितेंद्र राठोड, पो.ना. समाधान टहाकळे, इम्रान सैय्यद, शुध्दोधन ढवळे, किशोर पाटील, योगेश बारी, सुधिर सावळे, छगन तायडे, किरण पाटील, राहूल रगळे, विशाल कोळी यांनी केली.

Protected Content