पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोकरबारी येथील धरणात बुडाल्याने तिघा मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, वंजारी येथील दर्ग्यावर काही बालके गेली होती. त्यांचे पाय चिखलाने भरल्याने पाय धुण्यासाठी ते भोकरबारी धरणात उतरले. मात्र यातील तिघे बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मोहंमद एजाज, मोहंमद हसन आणि आवेश रजा ही मयत मुलांची नावे आहेत. यापैकी मोहंमद एजाज ( वय 12) आणि मोहंमद हसन (वय 16) हे दोन सख्खे भाऊ असून पारोळ्यातील बडा मोहल्ला येथील ते रहिवासी आहेत. आवेश हा त्यांचा आतेभाऊ आहे. तो मालेगाव येथील रहिवासी असून खास उरूसासाठी तो पारोळा येथे आपल्या मामाकडे आला असता त्याच्यावर काळाने झडप घातली.
ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ही बालके बुडत असतांना त्यांच्या सोबतच्या मुलांनी ओरडून मदत मागितली. तथापि, तोवर उशीर झालेला होता. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पारोळ्यातील बडा मोहल्ला या परिसरावर शोककळा पसरली आहे.