सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूरच्या प्रांताधिकारीपदी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
फैजपूरच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी देवयानी यादव या त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ पूर्ण करून उत्तर प्रदेशातील कॅडरमध्ये गेल्याने हे पद रिक्त होते. या ठिकाणी नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर या पदावर बबनराव काकडे यांची नियुक्ती करण्यात आली असून महसूल व वन खात्याचे उपसचिव महेश वरूडकर यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत.
बबनराव काकडे उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी असून त्यांनी याआधी रावेरचे तहसीलदार म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कारभार पाहिला आहे. कर्तव्यदक्ष व संवेदनशील अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. या पार्श्वभूमिवर, त्यांची फैजपूरच्या प्रांताधिकारीपदी झालेली बदली स्वागतार्ह अशीच आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.