दोघात तिसरा, रावेरात पेच वाढला : अजून एकाने ठोकला दावा !

मुक्ताईनगर-पंकज कपले | एकीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा पेच कायम असतांना अजून एका उमेदवाराने तगडा दावा दाखल केल्यामुळे येथील उमेदवारीची रस्सीखेच वाढल्याचे दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा रावेर मतदारसंघातून तिकिट दिले आहे. पक्षाच्या दुसर्‍या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यांनी प्रचार देखील सुरू केलाला आहे. दुसरीकडे यंदा ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळाली असून येथुन पहिल्यांदा आमदार एकनाथराव खडसे यांनी उमेदवारी करण्याची घोषणा केली होती. मात्र वैद्यकीय कारणासाठी त्यांनी माघार घेतली. यानंतर येथून उमेदवारीसाठी खर्‍या अर्थाने रस्सीखेच सुरू झाली.

यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, रावेरचे माजी आमदार अरूण पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, युवा नेते विनोद तराळ आदींची नावे शरद पवार गटातर्फे समोर आली. यातील काही नावे ही विविध कारणांनी गळून पडली. यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील व माजी आमदार संतोष चौधरी यांची नावे स्पर्धेत उरली. यातील संतोषभाऊंनी तर तिकिट आपल्यालाच मिळणार असल्याचा ठाम दावा केला. एवढेच नव्हे तर चौधरींच्या समर्थकांनी त्यांची भुसावळातून जंगी मिरवणूक देखील काढली.

दरम्यान, हे सर्व होत असतांना मुक्ताईनगरातील ख्यातनाम कंत्राटदार तथा योगीराज कन्स्ट्रक्शनचे संचालक विनोद सोनवणे यांचे नाव देखील आता शरद पवार गटातर्फे समोर आले आहे. स्थापत्यशास्त्रातील मोठे नाव असणारे सोनवणे हे मराठा समाजातील मान्यवर म्हणून गणले जातात. अलीकडेच त्यांनी अतिशय जंगी पध्दतीत वाढदिवस साजरा केल्यावर जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. ते स्थानिक पातळीवरून राजकीय कारकिर्द सुरू करतील अशी चर्चा देखील रंगली होती. तथापि, आता त्यांनी थेट रावेेरमधून महाविकास आघाडीचे तिकिट मिळविण्यासाठी लॉबींग सुरू केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे सोनवणे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियात भावी खासदार म्हणून त्यांचे ब्रँडींग सुध्दा सुरू केले आहे. अजून एक योगायोग म्हणजे विनोद सोनवणे हे आमदार एकनाथराव खडसे यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जातात. यामुळे त्यांचा देखील सोनवणेंना पाठींबा मिळण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांनी बोलून दाखविली आहे.

महाविकास आघाडीचा रावेरातील उमेदवार हा कोण असेल याचा सस्पेन्स शिगेवर पोहचला असतांना आता दोन दावेदारांमध्ये तिसर्‍याने एंट्री केल्याने तिकिटाची चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. अर्थात, तिकिट एकालाच मिळणार असून तो नशीबवान कोण ? हे लवकरच समजणार आहे.

Protected Content