खानापूर येथील गोडाऊनची तपासणी; आढळल्या अवैध सलाई डिंकाच्या एकूण ६७ गोणी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन अधिकाऱ्यांनी कन्हैया नगर, खानापूर येथील एका गोडाऊनची तपासणी केली असता त्यात अवैध सलाई डिंकाच्या एकूण ६७ गोणी आढळून आल्या. त्यातील एकूण २ लाख ६२ हजार ९०० रुपये किंमतीचे २,३९० किलो अवैध डिंक जप्त करण्यात आले.

याविषयी अधिक माहिती अशी की, “धुळे प्रादेशिक वनसंरक्षक दि.वा.पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार, दि. २० सप्टेंबर रोजी यावल उपवनसंरक्षक प्रथमेश हाडपे तथा सहाय्यक वनसंरक्षक यावल, रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांचेसह मौजे कन्हैया नगर, खानापूर येथील शहनवाज सय्यद जमील यांचे भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोडाऊनची तपासणी करण्यात आली.

यावेळी त्या ठिकाणी बिनापासी अवैध सलाई डिंकाच्या एकूण ६७ गोणी ठेवलेल्या आढळल्या. या गोण्याचे मोजमाप केले असता २ लाख ६२ हजार ९०० रुपये किंमतीची २,३९० किलो भरले. भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये सदर सलाई डिंक जप्त करून प्र. रि. क्र.०४/२०२२ अन्वये गुन्हा नोंद करून शासकीय वाहनाने रावेर आगार येथे जमा करण्यात आला.”

या कार्यवाहीत अहिरवाडी वनपाल राजेंद्र सरदार, रावेर वनपाल रवींद्र सोनवणे, सहस्त्रलिंग वनपाल अरविंद धोबी, पाल वनपाल दीपक रायसिंग, वनरक्षक संभाजी सूर्यवंशी, राजू बोंडल, रमेश भुतेकर, संजय राजपूत, युवराज मराठे, सुधीर पटणे, लेदा पावरा मुकेश तडवी, आयशा पिंजारी, कल्पना पाटील, सविता वाघ, वाहन चालक सुनील पाटील, विनोद पाटील अधिसंख्या वनमजूर व संरक्षण मजूर यांनी संयुक्त रित्याकार्यवाही केली.

Protected Content