जळगाव प्रतिनिधी । शेतीच्या उताऱ्याबाबत काढलेली नोटीस परत घेण्यासाठी दोन लाखाची लाच मागणाऱ्या बोदवड येथील तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी या तीन महसूल कर्मचाऱ्यांना १८ रोजी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्या. एस.पी. डोरले यांनी तिघांची जामीनावर मुक्तता केली आहे.
तहसीलदार हेमंद भागवत पाटील (वय-४०)रा. भरडी ता. जामनेर. ह.मु. बोदवड, मंडळाधिकारी संजय झेंडून शेरनाथ (वय-४७) रा. भुसावळ आणि तलाठी निरज प्रकाश पाटील (वय-३४) रा. हेडगेवार नगर, बोदवड अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींतर्फे ॲड.आर.के.पाटील, ॲड. राजेंद्र रॉय, ॲड. आश्विनी डोलारे तर सरकारतर्फे ॲड. विजय खडसे यांनी काम पाहिले.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे फैजपूर ता. यावल यांचे बोदवड तहसीलच्या हद्दीत शेती खरेदी केली. शेतीच्या सातबारावर पत्नीचे नाव लावण्यात आले होते. नंतर कालांतराने शेतीच्या उताऱ्यावर पुन्हा मुळ मालकाचे नाव आल्याने तक्रार यांनी मंडळाधिकारी यांना भेटून पुन्हा शेतीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला. नंतर सदर उताऱ्याबाबत तहसीलदार यांनी हरकत घेवून संबंधित पुरावा देण्यासाठी नोटीस काढली. तहसीलदारांनी नोटीस रद्द करण्याच्या तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती २ लाख रूपयांची मागणी केली होती.