Home क्राईम घरफोडी प्रकरणी तीन आरोपी अटकेत ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी प्रकरणी तीन आरोपी अटकेत ; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
9


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील मदनीनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत जामनेर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या मालापैकी सुमारे ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मसूद अख्तर मुजफ्फर हुसेन (वय ५०), रा. मदनीनगर, जामनेर हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना २५ जून ते २९ जून २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सुमारे ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ९ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्हा घडण्यापूर्वी परिसरातील काही नागरिकांनी रेकॉर्डवरील आरोपी शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४) याला त्याच्या साथीदारांसह घटनास्थळाच्या परिसरात फिरताना पाहिले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी समीर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान समीरने ही घरफोडी मोहम्मद फातिर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद (वय २०) आणि शेख अमीर शेख जाकीर (वय १९) यांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद फातिर याला जामनेर येथून, तर शेख अमीर याला नाशिक येथून ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी ३०.०१ ग्रॅम सोन्याचे दागिने, १२ भार चांदीचे दागिने, ७१ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण ६ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास जामनेर पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस शिपाई सचिन महाजन, ज्ञानेश्वर देशमुख आणि सुशील सत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


Protected Content

Play sound