भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ रेल्वे स्टेशनवर तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी आरोपी सुजीतकुमार ईश्वरसिंग पाटील (वय ३७, जळगाव) याला न्यायालयाने दोषी ठरवले असून, ७,००० रुपयांचा दंड आणि न्यायालय उठेपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भुसावळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे मार्ग) व्ही. बी. साळुंके यांनी २८ फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला. दंड न भरल्यास आरोपीला ७ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल.
रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), भुसावळ यार्डच्या तक्रारीनुसार, आरोपी सुजीतकुमार पाटील हा धार्मिक यात्रेसाठी प्रवाशांना अनधिकृतरित्या तिकिटे पुरवायचा. २० जुलै २०२३ रोजी भुसावळ रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक ५ वर त्याला अटक करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्याकडून २२ ई-तिकिटे आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने तिकिटे खरेदीसाठी २,५०० ते ११,००० रुपये कमिशन घेत असल्याची कबुली दिली.
३० जानेवारी २०२५ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सरकारी वकील आर. के. ताम्रकार आणि ए. के. सिंग यांनी आरोपीविरुद्ध पुरावे सादर केले. यात साक्षीदारांचे जबाब, आरोपीचा कबुलीजबाब आणि जप्ती पंचनाम्याचा समावेश होता. आरोपीच्या बाजूने वकील योगराज बोरसे यांनी बचाव केला.
न्यायालयाने रेल्वे कायदा कलम १४३ अंतर्गत आरोपीला दोषी ठरवून ७,००० रुपयांचा दंड, (दंड न भरल्यास ७ दिवस साधा कारावास) आरोपीचा मोबाइल आणि २२ ई-तिकिटांचा डेटा हटवून, अपील कालावधीनंतर मूळ मालकाने मागणी केल्यास परत करणे; अन्यथा सरकारी लिलावात विक्री करणे, बंधपत्राची अट – आरोपीने २५,००० रुपयांचे वैयक्तिक आणि जामीनदार बंधपत्र द्यावे. अभियोक्ता ए. के. सिंग यांनी कठोर शिक्षेची मागणी केली, तर बचाव पक्षाने आरोपी गरीब कुटुंबातील असल्याचे सांगून सौम्य शिक्षेची विनंती केली. न्यायालयाने निर्णय देताना म्हटले, “आरोपीने रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. त्यामुळे त्याला संबंधित कायद्यांतर्गत शिक्षा दिली जाते.”