उनपदेव येथे ‘गुलाल्या बाजाराला’ आदिवासी बांधवांनी उधळला गुलाल


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद येथील उनपदेव शरभंग पाडा येथे आदिवासी बांधवांनी सालाबादप्रमाणे भोंगऱ्या सणाच्या तयारीचा शुभारंभ ‘गुलाल्या बाजार’ भरवून केला. सात दिवस आधी भोंगऱ्या देवाची पूजा करून गुलाल उधळत आदिवासी बांधवांना येत्या सोमवारच्या भोंगऱ्या बाजाराची सूचना देण्यात आली.

३ मार्च रोजी सकाळी १० वाजता, शरभंग पाडा येथे भोंगऱ्या बाजार भरवण्यात येणाऱ्या मैदानाच्या एका बाजूला भोंगऱ्या देवाची स्थापना करण्यात आली. पुजारी भाया हुलकाऱ्या यांनी गुलाल, अगरबत्ती आणि श्रीफळ अर्पण करून पूजा केली, त्यानंतर उपस्थितांनी गुलाल उधळत पारंपरिक पद्धतीने हा विधी पूर्ण केला. या माध्यमातून सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातील आदिवासी बांधवांना सोमवारच्या भोंगऱ्या बाजाराची सूचना देण्यात आली.

या प्रसंगी पोलीस पाटील देवसिंग जामसिंग पावरा, गाव डाया गजीराम पावरा, आदिवासी सेवक संजीव शिरसाठ, पोलीस पाटील गणदास बारेला, माजी ग्रामपंचायत सदस्य जावेदखान पठाण, पत्रकार रफिक मण्यार, सचिन महाजन, रामकृष्ण महाजन यांच्यासह आदिवासी समाजातील प्रमुख व्यक्ती आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

भोंगऱ्या हा आदिवासी समाजाचा पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. या निमित्ताने संघटन, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकता जपण्याचा संदेश देण्यात येतो. या ‘गुलाल्या बाजार’ सोहळ्याने भोंगऱ्या बाजाराच्या तयारीस अधिकृत सुरुवात झाली असून, येत्या सोमवारी मोठ्या उत्साहात भोंगऱ्या बाजार साजरा होणार आहे.