Home क्राईम नशिराबादचा सराईत गुन्हेगार ‘शोएब बिल्डर’वर MPDA अन्वये धडक कारवाई ; येरवडा मध्यवर्ती...

नशिराबादचा सराईत गुन्हेगार ‘शोएब बिल्डर’वर MPDA अन्वये धडक कारवाई ; येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

0
7


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद व परिसर क्षेत्रात आपल्या गुन्हेगारी कारवायांनी आणि दहशतीने दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार शोएब शेख गुलाम नबी उर्फ ‘शोएब बिल्डर’ याच्यावर अखेर एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशान्वये त्याला एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

ख्वाजा नगर, नशिराबाद येथील रहिवासी असलेला ३५ वर्षीय संशयित आरोपी शोएब बिल्डर हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. त्याच्याविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे, बेकायदेशीर गर्दी जमवून प्राणघातक मारहाण करणे तसेच तडीपारीच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन करणे यांसारखे एकूण ७ गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत. त्याच्या सततच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया आणि सामाजिक शांततेला निर्माण झालेला धोका लक्षात घेता, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता.

हा प्रस्ताव जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला. प्रस्तावाची गांभीर्यपूर्वक पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शोएब बिल्डर याच्या स्थानबद्धतेचे थेट आदेश पारित केले. आदेश मिळताच नशिराबाद पोलीस पथकाने अत्यंत सतर्कतेने कारवाई करत शोएबला ताब्यात घेतले आणि कडक पोलीस बंदोबस्तात त्याची पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत स.पो.नि. योगिता एम. नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रवीण लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे यांच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.


Protected Content

Play sound