थर्टी फर्स्टनिमित्त होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घाला – यावल हिंदू जनजागृती समितीची मागणी

यावल प्रतिनिधी । ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकारांसह फटाके फोडण्यावर प्रतिबंध लावा, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल येथे नायब तहसीलदार आर.के. पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदु जनजागृती समिती ही राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती करणारी सेवाभावी संस्था आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतिके आणि मानचिन्हे यांची विटंबना रोखणे, फटाक्यांद्वारे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण, तसेच देवतांची विटंबना थांबवणे, अशा विविध विषयांमध्ये समिती गेली २० वर्षे जनजागृती करत आहे. तसेच अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांना साहाय्यही करत आहे. तरी गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ‘ओमीक्रॉन’ नावाच्या कोरोनाच्या नवा’व्हेरीयंट’मुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता 25 ते 31 डिसेंबरपर्यंत नवर्षानिमित्त सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड- किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान- धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावे. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, या अपप्रकारांच्या माध्यमातून कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होते तसेच त्यांचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासनावर येतो. त्याचबरोबर देशाची युवापिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी या सर्व सूत्रांचा गांभीर्याने विचार करून सामाजिक आरोग्याचे रक्षण व्हावे, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.

या निवेदनावर हिन्दु जनजागृतीचे प्रशांत जुवेकर यांच्यासह गुणेश वारुळकर, मयूर महाजन, चेतन भोईटे, हर्षल भोईटे, अक्षय बारी, पराग बारी आणि धीरज भोळे यांच्या स्वाक्षरी असुन या प्रसंगी आदी धर्मप्रेमी तरूण प्रामुख्याने उपस्थित होते.

 

Protected Content