भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमटीएल इनडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक, थायलंड आणि रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशिप स्पर्धेत भुसावळच्या तीर्थराज मंगेश पाटील याने दमदार कामगिरी केली आहे.
१८ ते १९ जून २०२५ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत भारतासह रशिया आणि थायलंडसह अनेक देशांतील स्केटर्स सहभागी झाले होते. यामध्ये ८ वर्षांखालील गटात तीर्थराजने इनलाईन आणि क्वाड्स स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके पटकावली, तर रिले मॅचमध्ये तीन रौप्य पदके जिंकून तो विजयी ठरला.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल तीर्थराजला एमटीएल इनडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक, थायलंड यांच्या वतीने खास ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तीर्थराजच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक पियुष दाभाडे सर, दिपेश सोनार सर आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. भिकन अंबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, एन.के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे मॅडम आणि क्रीडा शिक्षिका नम्रता गुरव मॅडम यांनीही त्याला मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे, खा. स्मिताताई वाघ, भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, आमदार अमोलभाऊ जावळे यांनी फोनवरून तीर्थराजचे अभिनंदन केले.
तीर्थराज पाटीलच्या या यशाने त्याच्या तळवेल आणि भुसावळ येथील घरी आनंदाचे वातावरण आहे. तो एम.ई.एस. चे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाष पुरुषोत्तम पाटील यांचा नातू असून, निलेश सुभाष पाटील यांचा पुतण्या आहे. विशेष म्हणजे, तीर्थराज हा न्हावी येथील लक्ष्मण ईश्वर कोलते यांच्या कन्या रोहिणी पाटील यांचा मुलगा असल्याने न्हावी गावातही आनंदोत्सव साजरा केला जात आहे. त्याच्या या यशाने महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.