जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरील एका बॅटरी दुकानातून ४१ हजार रुपये किमतीच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मंगळवारी २० मे रोजी दुपारी १ वाजता आकोला जिल्ह्यातून अटक केली आहे. चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली ६ लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी आणि चोरलेल्या बॅटऱ्याही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील रहिवासी आणि ‘चौधरी बॅटरी ट्रेडिंग’चे मालक अब्दुल्ला किताबुल्ला चौधरी (वय ४७) यांच्या दुकानात चोरी झाली होती. चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर वाकवून विविध कंपन्यांच्या ४१ जुन्या बॅटऱ्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी १९ मे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यांनी घटनास्थळाचे आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक माहितीच्या विश्लेषणातून आणि गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनाचा वापर केल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेल्हारा (जि. अकोला) येथे जाऊन गुन्ह्यातील दोन आरोपींना जेरबंद केले. या गुन्ह्यात अजमदउल्ला अमानतउल्ला खान (वय २४, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि सैय्यद दानिश सैय्यद इस्माईल (वय २५, रा. घोडेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांना मंगळवारी २० मे रोजी दुपारी १ वाजता अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच, गुन्ह्यात वापरलेली (एमएच ३० बीडी ६८७३) क्रमांकाची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.