जैन हिल्सवर फुलला आंब्यांचा महोत्सव: ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे उद्घाटन


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या वतीने शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगाच्या दालनात ‘मॅंगो फिस्टा’ या भव्य आंबा प्रदर्शनाचे आज (२१ मे) औपचारिक उद्घाटन झाले. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फित कापून या प्रदर्शनाची सुरुवात झाली. या प्रदर्शनात जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या तब्बल १५० जातींचे आंबे पाहण्याची संधी उपलब्ध आहे.

या उद्घाटनप्रसंगी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित व अतुल जैन, अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन फार्मफ्रेश फूड्स लि. चे संचालक अथांग जैन, सौ. अंबिका जैन, अभंग जैन, आत्मन जैन, आंतरराष्ट्रीय पातळीचे आंबातज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी.के., डॉ. अनिल पाटील, कृषी विभागाचे सहकारी अजय काळे, नितीन पाटील, शंकर गाडेकर यांच्यासह सर्व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या शेती संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आंब्यावर सुरू असलेले संशोधन कार्य या प्रदर्शनातून अधोरेखित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतासह विदेशातील १५० हून अधिक नामांकित प्रजातीच्या आंब्यांच्या जातींचा समावेश आहे. जैन इरिगेशनद्वारा विकसित केलेल्या टिश्यूकल्चरच्या प्रजाती, जैन संकरित (हायब्रीड) आंब्याच्या ३४ प्रजाती, तसेच थायलंड, मेक्सिको, युरोप, युएसए, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राईल यांसारख्या विविध देशांतील विदेशी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे आंबे येथे पाहण्याची संधी मिळणार आहे.

हे ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शन आज (२२ मे) सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. आंबाप्रेमी आणि शेतीतील अभ्यासकांनी या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.