जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ आणि उपाध्यक्ष डॉ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची (तिरुचिरापल्ली) च्या संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असून, डॉ. पाटील यांच्या केळी पिकाच्या दीर्घ अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा आता राष्ट्रीय स्तरावरील संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी अभिनंदन केले आहे.
डॉ. के.बी. पाटील हे गेल्या तीस वर्षांपासून केळी पिकाच्या विकासासाठी अथकपणे कार्यरत आहेत. त्यांनी केळी उत्पादन तंत्रज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन करून जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात क्रांती घडवून आणली आहे. केळीची काढणीपूर्व व काढणीपश्चात हाताळणी तसेच निर्यातीमध्ये त्यांनी तीस वर्षे काम करून देशातून होणारी केळीची निर्यात वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
त्यांनी देशात प्रथमच गादी वाफा, मल्चिंग, फॉस्फोरिक अॅसिडचा वापर, वर्षभर केळीसाठी फर्टिगेशनचे तंत्रज्ञान, केळीसाठी २०० ग्रॅम नत्र, ७० ग्रॅम स्फुरद व ४०० ग्रॅम पालाश प्रति झाड, फ्रुट केअर पद्धती असे अनेक अभिनव तंत्रज्ञान विकसित केले. जैन टिश्यूकल्चरच्या ‘ग्रॅडनैन’ या विदेशी जातीला संपूर्ण देशात लोकप्रिय करण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जगातील सर्व प्रमुख केळी उत्पादक देशांना भेटी देऊन त्यांनी केळी पिकाचा सखोल अभ्यास केला आहे. केळीबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवले आहे.
केळी पिकाचा प्रचंड अभ्यास व अनुभव यामुळेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी डॉ. के.बी. पाटील यांची संशोधन सल्लागार समितीवर निवड केली आहे. ही निवड त्यांच्या तीस वर्षांच्या योगदानाला मिळालेली एक मोठी पावती मानली जात आहे.