जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रामनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून सोने आणि रोकड लंपास केली, तर काव्यरत्नावली चौकात दोन दुधाच्या टपऱ्या फोडून गल्ल्यातील रक्कम चोरून नेली. या चोरीच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
जळगाव शहरातील डीमार्ट समोरील रामनगर परिसरात राहणाऱ्या रचना वाडकर यांच्या नातेवाईकांचे घर काही दिवसांपासून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातून चोरट्यांनी दोन तोळे सोने आणि १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ऐवज चोरून नेला. ही चोरीची घटना सोमवारी, ५ मे रोजी सकाळी उघडकीस आली.
दरम्यान, याच रात्री चोरट्यांनी शहराच्या इतर भागातही हात साफ करण्याचा प्रयत्न केला. आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या एका दुधाच्या टपरीचे शटर उघडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र ते अयशस्वी ठरले. मात्र, काव्यरत्नावली चौकात असलेली दूधाची टपरी चोरट्यांनी फोडली. यात टपरीच्या गल्ल्यातून १० हजार रुपयांची रोकड व इतर सामान चोरून नेण्यात आली. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.