माझ्या पक्षात राजकीय फेरीवाले नाही : राज ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत आजच्या राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले. त्यांनी सध्याच्या राजकीय फेरीवाल्यांवर टीका करताना म्हटले, “आज असंख्य पक्षांना प्रश्न पडला आहे की, आमदार-खासदार येऊन गेले तरीही आमचे कार्यकर्ते एकत्र कसे राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात, पण आजचे राजकीय फेरीवाले एका फुटपाथवरून दुसऱ्या फुटपाथवर जातात. माझ्या पक्षात असे नाही. आम्ही खणखणीत दुकान उभारू, फेरीवाले होणार नाही,” असा घणाघात त्यांनी केला.

राज ठाकरे यांनी पुढील मोठ्या भाषणाची झलक देत म्हटले, “मी आज फार बोलणार नाही. गुढीपाडव्याचा मेळावा अवघ्या २० दिवसांवर आहे. तिथे मी दांडपट्टा फिरवणार आहे, मग आत्ताच चाकू आणि सुरे कशाला काढू?” त्यांनी सदानंद मोरेंकडून आजच्या परिस्थितीवर भाष्याची अपेक्षा व्यक्त केली आणि “राजकारणाचा चिखल झाला आहे. मतं मिळवण्यासाठी डोकी फोडली जात आहेत, आगी लावल्या जात आहेत, आणि तरीही आमच्या लोकांना समजत नाही,” अशी खंतही व्यक्त केली.

रामायणातील उदाहरण देत त्यांनी राज्यातील विकासकामांवर टीका केली. “रामचंद्रांनी १४ वर्षांच्या वनवासात वानरसेना गोळा केली, सेतू बांधला, श्रीलंकेत जाऊन रावणाचा वध केला. आणि आपण? वांद्रे-वरळी सी लिंक बांधायला १४ वर्षं घेतली!” असे म्हणत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी भाष्य केले. “महिला दिन दरवर्षी ८ मार्चला साजरा केला जातो. पण महिला विसर कोणता? तो म्हणजे जिजाऊ! जिजाऊंच्या मनात स्वराज्याचं स्वप्न होतं, आणि त्यांनी ते शिवरायांकडून प्रत्यक्षात उतरवलं. महाराष्ट्र हा प्रगत महिलांचा प्रदेश आहे, आपण त्यातून काही शिकणार का?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

आपला पक्ष आणि संघटना बळकट करणे हेच प्राथमिक लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्या गटाध्यक्षाने आणि त्याच्या कुटुंबीयांनीही हे वाटले पाहिजे की, पक्ष माझ्या मुलाची काळजी घेत आहे,” असे सांगत त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संघटनेसाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मोठे भाषण होणार असल्याचे स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी आज थेट सरकार आणि विरोधक दोघांनाही घरचा अहेर दिला.

Protected Content