
मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईत आज विरोधकांनी आयोजित केलेल्या ‘सत्याच्या मोर्चा’ला जनसागर उसळला होता. हजारो लोकांनी उपस्थित राहून मतदार याद्यांतील गैरव्यवस्थेविरोधात आपला संताप व्यक्त केला. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अन्य अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. मतदारयाद्या स्वच्छ करा, दुबार मतदारांची नावे हटवा आणि त्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली.
मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका करत, मतदार याद्यांतील घोळ दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी ठाम मागणी केली. “अरे तुम्हाला मग आडवलं कुणी?” असा सवाल करत राज ठाकरे म्हणाले, “एखादे वर्ष निवडणूक लांबवली तरी काही फरक पडणार नाही. पण आधी मतदार याद्या स्वच्छ करा. शेकडो दुबार मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ आहे. आजचा मोर्चा हा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष सगळेच दुबार मतदारांबाबत बोलत आहेत. अगदी भाजपचे आणि शिंदे गटाचे काही लोकही हे मान्य करत आहेत. मग निवडणुकीची एवढी घाई का? मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका.”
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात गंभीर आरोप करत सांगितले की, “कल्याण ग्रामीण, डोंबिवली, भिवंडी आणि मुरबाड भागात तब्बल ४ हजार ५०० दुबार मतदार आहेत. इतकंच नव्हे तर काही मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलं आहे. हे लाखोंच्या संख्येने होत आहे. निवडणूक प्रक्रियेची ही खिल्ली आहे,” असे ते म्हणाले.
मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनाद्वारे विरोधकांनी मतदारयाद्यांतील गोंधळाबाबत जनजागृती करत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काळात या मागणीवर सरकार कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



