
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांविरोधात आणि त्यांच्या उत्पादनाला न्याय्य भाव मिळावा, या मागण्यांसाठी जळगाव तालुक्यात आज शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सौ. दीपाली भाऊसाहेब सोनवणे यांच्या आयोजनातून हा मोर्चा किनोद (ता. जळगाव) येथे १ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता पार पडला. या मोर्चाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जनआवाज घुमला.
शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर स्पष्ट दिसून आला. सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला केवळ २ ते ३ रुपये किलो एवढाच दर मिळत आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा वसूल होत नाही. या बिकट परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी आणि शेतकरी दोघांना एकत्र घेऊन केळीचा भाव स्थिर ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रा. सोनवणे यांनी यावेळी केली.
त्यांनी पुढे इशारा देत सांगितले की, “शेतकऱ्यांचे प्रश्न कायम दुर्लक्षित केले जात आहेत. जर सरकारने आणि प्रशासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हाल थांबवले नाहीत, तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल. दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक तत्काळ थांबवावी. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शेतकऱ्यांसाठी किमान १० टक्के निधी राखीव ठेवावा. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आता शेतकऱ्यांना उत्तर द्यावे लागेल — अन्यथा आम्ही ‘गाड्या अडवा’ आंदोलन उभे करू,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद घुगे, मनसेचे प्रदीप पाटील, किरण सोनवणे, सुनील सोनवणे, शैलेश चौधरी, शेतकरी नेते राजुदादा नवाल, भाऊसाहेब पाटील, शांताराम बापू पाटील, गोपाल पाटील, अशोक पाटील, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, धनराज वारडे, सुकदेव बाविस्कर, भैय्यादादा पाटील, भगवान धनगर, विजू सपकाळे, अनिल सपकाळे, जगन्नाथ पाटील, योगेश पाटील, नितीन पाटील यांसह भोकर, भादली खुर्द, कठोरा, फूपनी, नांद्रा बुद्रुक, फेसर्डी, नंदगाव, देवगाव, गाढोदा, जामोद, पळसोद, कानळदा, पिलखेडा, करंज, धानोरा, सावखेडा आणि पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
किनोद परिसरात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झालेला हा मोर्चा सरकार आणि प्रशासनाला जागवणारा ठरला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आता आली आहे, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला.



